AMC Election : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, अर्ज भरण्यास प्रारंभ.
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेची तब्बल दोन वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणूक होत असून, निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मंगळवार, 23 डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर असून, या कालावधीत महापालिकेत इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्यासाठी सहा ठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महापालिकेच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर 2023 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत महापालिकेत प्रशासकराज सुरू होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.या निवडणुकीत अहिल्यानगर महापालिकेच्या 17 प्रभागांतील 68 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएम आदी पक्षांचे इच्छुक उमेदवार गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारीला लागले आहेत. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असलेली ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी इच्छुकांना विविध विभागांचे उंबरठे झिजवावे लागत असून, त्यामुळे महापालिकेत चांगलीच धावपळ सुरू आहे.
What's Your Reaction?